नेवासा फाटा येथे फर्निचरच्या गोदामाला आग;एकाच कुटुंबातील ५ जणांचा गुदमरून मृत्यू...
नेवासा फाटा परिसरात कॉलेजजवळील कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला.
रविवारी मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,दुकानाच्या मागील बाजूस वास्तव्यास असलेल्या मयूर अरुण रासने (वय ३६) यांच्यासह त्यांची पत्नी पायल (३०), दोन लहान मुले अंश (११) व चैतन्य (६) आणि वयोवृद्ध आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (८५) यांचा या आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मयूर यांचे वडील अरुण रासने व त्यांची पत्नी हे मालेगाव येथे नातलगांकडे गेले होते, त्यामुळे ते बचावले आहेत.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक तपासात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुकानात मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर, गाद्या, व इतर ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले.
स्थानिकांनी बचावकार्य सुरू करत अग्निशमन दलालाही कळवले तेही घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीचा वेग इतका जबरदस्त होता की आत अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढणे शक्य झाले नाही.या घटनेनंतर नेवासा फाटा परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेने व्यावसायिक ठिकाणांमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.परिसरातील व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाकडे दुकानांमध्ये अग्निशमन यंत्रणा अनिवार्य करण्याची आणि नियमित तपासणी करण्याची मागणी केली आहे.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, सखोल तपास सुरू केला आहे. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे.



Post a Comment
0 Comments