श्रीरामपूर / प्रतिनिधी – तालुक्यातील राजकीय समीकरणांना मोठी कलाटणी देणारी महत्वाची घटना काल घडली. उबाठा गटाचे उत्तर महाराष्ट्रातील शिव आरोग्य सेना प्रमुख म्हणून ओळख असलेले आणि सामाजिक कार्यातून लोकमान्यता मिळवलेले डॉ. महेश शिरसागर यांनी काल पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांच्या शहर दौऱ्यादरम्यान हा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शिरसागर यांनी शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून रुग्णसेवा, मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान, वैद्यकीय मदत असे अनेक उपक्रम राबवून ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे आगामी निवडणुकीच्या राजकीय चित्रात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले,“श्रीरामपूरच्या विकासात, आरोग्यसेवेत आणि सामाजिक बांधिलकीत हा प्रवेश निर्णायक ठरेल. युवकांना दिशा देणारे नेतृत्व आणि विकासाला वेग देणे हे आमचे ध्येय आहे.”दरम्यान डॉ. शिरसागर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले,“हा प्रवेश हा केवळ राजकीय निर्णय नाही; तर समाजसेवेला नवा आयाम देण्याचे पाऊल आहे. जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी भाजपची वाट निवडली आहे.”
या प्रवेशानंतर श्रीरामपूरमध्ये तात्काळ चर्चांना उधाण आले असून, नगरपालिकेतील सत्ताकारण, गटबाजी आणि आगामी निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर शिरसागर यांचा पक्षप्रवेश हा उबाठा गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
शहरात वाढलेल्या चर्चांमुळे एकच सूर जाणवतो - “श्रीरामपूर नव्या राजकीय पर्वाकडे वाटचाल करत आहे.”


Post a Comment
0 Comments