महाराष्ट्रन्यूज 24 तास:-पोलिसांच्या अंगावर वाळू तस्करांनी घातला ट्रॅक्टर ; भामठाण येथिल तिघांविरोधात गुन्हा दाखल...
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- रवींद्र आसणे
श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथील नदीपात्रातून ट्रॅक्टरमधून अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाळू तस्करांनी ट्रॅक्टर घालुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात भामाठाण येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्ञानेश्वर देविदास बनसोडे, संतोष कडूबा दळे, सोमनाथ कोंडीराम सुरासे (तिघे रा. भामाठाण, ता. श्रीरामपूर) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, गोदावरी नदीपात्रातून कमालपूर येथे अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांना शुक्रवारी (ता.१८) दुपारी १२ वाजता समजली. त्यांच्या पथकातील हवालदार प्रशांत रणनवरे, वारे, मुख्य हवालदार पठाण, हवालदार वैभव काळे हे कमालपूर येथे दुपारी एक वाजता घटनास्थळी दाखल झाले. येथे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाळूने भरलेले दिसले. हवालदार काळे हे ट्रॅक्टरच्या चालकास थांबवण्याचे सांगत असताना चालक संतोष दळे यांचे ताब्यातील ट्रॅक्टर ज्ञानेश्वर बनसोडे याने स्वतःच्या ताब्यात घेतला. त्यांनी संगनमत करून काळे यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काळे हे बाजूला झाल्याने ते वाचले. त्यानंतर सदर चालक हा ट्रॅक्टर घेवून तेथून पळून गेला. त्यानंतर पोलीस पथकातील रणनवरे व वारे यांनी सदर ट्रॅक्टर चालकास पकडून आणले. पोलिसांनी सहा लाख रूपये किमतीचा ट्रॅक्टर (क्र. एमएच १७ एव्ही ४३६७)!त्यात दोन ब्रास वाळू आणि दुसरा ट्रॅक्टर (क्र. एमएच १७ सीआर ५२०२) त्यात दोन ब्रास वाळू असा एकूण १२ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हवालदार काळे यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय वाळूची चोरी, पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहेत.

Post a Comment
0 Comments