ओझर येथे पोळा सण उत्साहात साजरा"श्री बाणेश्वर नंदी" ठरले आकर्षणाचे केंद्र...
ओझर /प्रतिनिधी:- अमर आढाव
शेतकऱ्यांचा मुख्य सण म्हणून ओळखला जाणारा पोळा ओझर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच गावात सणाचे वातावरण रंगले होते.
सायंकाळी मारुती वेस येथील श्री हनुमान मंदिरात मिरवणुकीने नंदी महाराज आगमन सोहळा दणदणाटात पार पडला. यात जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रम (जनशांती धाम) येथील "श्री बाणेश्वर महादेव नंदी" विशेष आकर्षण ठरले. पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतमित्र बैलांना स्नान घालून हार-फुले, रंगीबेरंगी फुगे, आकर्षक झगमगाटी काठ्या व झुलांनी सजवले. गोंदण व रंगकामाने सजलेले बैल ढोल-ताशांच्या गजरात व लेझीम पथकांच्या तालावर गावातून मिरवण्यात आले. शेतकऱ्यांनी बैलांची पूजा करून त्यांच्या आरोग्य व शेतसंपन्नतेसाठी प्रार्थना केली. पारंपरिक पोळ्याची गाणी गावकऱ्यांच्या ओठांवर गुंजली आणि सणाला अधिक रंगत आणली. शहर व उपनगरातील शेतकरी बांधवांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात बैलजोडींच्या मिरवणुकीने गावात ऐक्य, उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
श्री बाणेश्वर नंदी ठरले आकर्षणाचे केंद्र जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराजांनी निर्माण केलेल्या देवभूमी जनशांती धाम येथील रुबाबदार "बाणेश्वर नंदी" समूहाचे हनुमान मंदिरात आगमन होताच भाविकांचा उत्साह ओसंडून वाहिला. प्रत्येक नंदीवर "बाणेश्वर महादेव नंदी" असे आकर्षक अक्षरांकन केलेले होते. भाविकांनी श्रद्धेने दर्शन घेतले, तर "जय बाणेश्वर, जय नंदिकेश्वर"च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.


Post a Comment
0 Comments